Tuesday, June 9, 2009

शिवाजी म्हणतो...

image

शिवाजी म्हणतो.. असा शिवरायांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान किंवा अधीक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही. लहानपणी ‘शिवाजी म्हणतो..’ असा खेळ गमतीने खेळला जायचा. पण आज राजकीय व सामाजिक नेतेमंडळी निमित्त शोधून हाच खेळ जाणतेपणी खेळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे यांच्या खेळात स्वत: शिवाजी महाराज काहीच म्हणत नाहीत, ही मंडळीच सर्व काही आपल्याला हवं ते आणि हवं तसं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात उभ्या राहणा-या भव्य शिवस्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादावरून पुन्हा सुरू झालेल्या मोठय़ांच्या खेळाचा घेतलेला मागोवा.

शिवाजी म्हणतो- खाली बसा.

शिवाजी म्हणतो- उभे राहा.

शिवाजी म्हणतो- चित्र काढा.

शिवाजी म्हणतो- खो खो हसा.

शिवाजी म्हणतो- अरबी समुद्रात माझं भव्य स्मारक बांधा..

खरं तर यातलं काहीच शिवाजी महाराज स्वत: म्हणत नाहीत. स्वत:ला त्यांचे सरदार, वारसदार, गडकरी, फडकरी आणि चरित्रकार म्हणवणारेच त्यांच्या नावाने सारं काही म्हणत राहतात. मग कधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला, तर कधी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला शिवाजी महाराजांचं नाव दिलं जातं.

.. आणि आता समुद्रमार्गे येणा-या शत्रूचा धोका सर्वप्रथम ओळखणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट समुद्रातच उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूदही (वास्तविक काही वर्षापूर्वी याच शिवस्मारकासाठी विलासराव सरकारकडून १०० कोटींची तरतूद जाहीर झाली होती.) केली आहे. अरबी समुद्रातलं हे शिवस्मारक समुद्राच्या अथांगतेशी स्पर्धा करेल, असं भव्यदिव्य करण्याची शासनाची इच्छा आहे. स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग मराठी मनामनांत पेरणा-या जाणत्या राजाची भव्य अश्वारूढ प्रतिमा शासनाला उभारायची आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कचा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा प्रत्येकाला स्वातंत्र्याचा संदेश देतो. तद्वतच शिवाजी महाराजांचा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची आठवण करून देणारा पुतळा शासनाला अरबी समुद्रात उभा करायचा आहे.

पण हे भव्यदिव्य स्मारक उभारायला सुरुवात होण्याआधीच ते (नेहमीच्या प्रथेप्रमाणे) वादात सापडलं आहे. आणि या वादाला निमित्त झालं आहे, ते या स्मारकासाठी नेमण्यात येणा-या समितीचं अध्यक्षपद. शिवस्मारक समितीचं अध्यक्षपद शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणार असल्याचं कुणी तरी खोडसाळपणे म्हणालं आणि वादाला तोंड फुटलं. कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवतेजाने भारावून आयुष्यभर शिवगाथाच गायली असली, तरी त्यांनी राजाशिवछत्रपती या कादंबरीच्या माध्यमातून स्वत:च्या म्हणजे ब्राह्मण समाजाच्या फायद्याचीच गाथा गायली, असा महाराष्ट्रातील बहुजन समाजातील पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या नेतेमंडळींचा आरोप आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचं नाव जाहीर झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ झाला. अगदी शिवस्मारकाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे असतील, तर ते स्मारक उखडून टाकण्याची भाषाही केली गेली.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात तापलेलं हे वातावरण बघून बाळासाहेबांनंतर त्यांना आदराचं स्थान देणा-या राज ठाकरेंनी या युद्धात उडी घेतली. आणि बाबासाहेबांच्या अंगाला हात लावाल, तर हजारो हात उठतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते विनायक मेटे, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर या मंडळींना दिला. आणि मग इशारे-प्रतिइशा-यांच्या फैरी दोन्ही पक्षांकडून झडतच राहिल्या. शेवटी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या स्मारकाचं अध्यक्षपद माझ्याकडेच आहे असं जाहीर केलं, तेव्हाच दोन्हीकडच्या तोफा थंडावल्या. मात्र तोवर शिवस्मारकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्याच ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तोंड फुटलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभं राहावं, असं खरं तर प्रत्येकाचंच मत आहे. पण या स्मारकासाठी स्थापण्यात येणा-या समितीत कोण कोण असणार, हा खरा वादाचा मुद्दा आहे. कारण शिवाजी महाराजांसंदर्भात काहीही असलं, तरी तिथे बाबासाहेब पुरंदरे असणार हे आता उघड सत्य आहे. पण तेच आजच्या बहुजन समाजाच्या नेत्यांना नको आहे. कारण बाबासाहेबांसारख्या केवळ शिवशाहीरानेच नाही, तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते आजचे निनाद बेडेकर अशा अनेकांनी मराठेशाहीचा खरा इतिहास दडवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. तेव्हा शिवस्मारकाच्या समितीत पुरंदरे नकोत, त्यांच्याऐवजी इतर जाणकारांचा विचार केला जावा, असं पुरुषोत्तम खेडेकर सारख्याचं म्हणणं आहे.

शिवस्मारकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व विनायक मेटे यांच्यात तर चांगलाच वाद रंगला होता. पण वास्तविक आपला या वादात काहीच संबंध नव्हता, असं सांगत विनायक मेटे म्हणतात, माझा आग्रह फक्त शिवस्मारकासाठी आहे. कारण १९९०पासून ते शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर असल्यापासून पुन्हा नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यावरही मीच या स्मारकाचा पाठपुरावा करत आहे. हे स्मारक लवकरात लवकर व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे. मग त्या समितीत बाबासाहेब पुरंदरे असोत, नाही तर इतर कुणी. पण ते तज्ज्ञ असावेत!

पण बाबासाहेब कुठल्याही परिस्थितीत नको, असं बहुजन समाजातील बहुतेकांचं म्हणणं आहे. कारण पूर्वसुरींनी सांगितलेला खोटाच इतिहास त्यांनी रंगवला. त्याची माहिती देताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात,रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट १६७२मध्ये स्वराज्याची स्थापना झाल्यावर झालेली असतानाही बाबासाहेब व इतर ब्राह्मण इतिहासकार रामदासांना शिवाजी महाराजांचं गुरुपद देतात. जेणेकरून एका ब्राह्मणाने मराठा राजाला घडवलं, असं सा-यांना वाटावं. म्हणूनच बाबासाहेबांना आमचा विरोध आहे.

या वादाची आच पोहोचूनही बाबासाहेब मात्र आताच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या आरोपाबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. एवढंच नाही, तर रामदास-शिवाजी भेटीचा १६७२ पूर्वीचा ठोस पुरावा अद्याप मिळालेला नसतानाही पाच वर्षापूर्वी एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रामदासांचीच बाजू उचलून धरली होती. त्यात ते म्हणतात, शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची १६७२ पूर्वी भेट झाली असल्याचे पुरावे मिळत नाही, हे मान्य आहे. पण कागद मिळत नाही, म्हणून तशी भेट झालीच नसल्याचं म्हणणं हे रामदास स्वामींवर अन्याय करण्यासारखं आहे.

विशेष म्हणजे याच संबंधात इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी नेमकं बाबासाहेबांच्या विरोधी मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, शिवाजी महाराज व रामदासांच्या भेटीचे उल्लेख फक्त रामदासी पोथ्यांमध्येच आढळतात आणि या पोथ्या खूप नंतरच्या काळातल्या आहेत. त्यामुळे या पोथ्यांच्या खरेपणाविषयी शंका घ्यायला खूप वाव आहे.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकात होऊन गेलेले बहुतांश इतिहास संशोधक ब्राह्मण होते आणि त्यांनी नेहमीच आपल्या सोयीचा इतिहास समाजाला सांगितला, असं म्हटलं जातं. बाबासाहेबही त्यांचीच री ओढत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा जोतिबा फुले यांनी १८६९मध्ये लावला. तर लोकमान्य टिळकांनी १८९६मध्ये शिवजयंतीला सुरुवात केली. तरीही बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्यासारखे इतिहास संशोधक शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनीच शोधून काढल्याचं सांगतात.

आजवर सातत्याने असा सोयीचा इतिहास सांगत आल्यामुळेच बाबासाहेबांसारखे चरित्रकार सातत्याने वादात सापडतात आणि शिवस्मारकासारखा चांगला प्रकल्पही वादग्रस्त ठरतो. एवढंच नव्हे, तर बाबासाहेबांच्या अध्यक्षपदाच्या वादातून या प्रकल्पाकडे नाहक ब्राह्मण-ब्राह्मणेतर दृष्टिकोनातून पाह्यलं जात आहे. या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर असा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण होऊ नये म्हणूनच शरद पवारांनीही नुकतंच शिवरायांचा इतिहास संभाजी ब्रिगेड ठरवणार काय? युगपुरुषांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करू नका. छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असा संकुचित विचार रुजणे धोकादायक आहे, अशा शब्दांत मराठा समाजाच्या नेत्यांना फटकारलं आहे.

शिवस्मारक असं जाती-पातीच्य वादात सापडल्यामुळेच हे स्मारकच नको, असाही सूर लावला जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिरीष पारकर म्हणाले, शिवस्मारक उभारण्यासाठी समुद्रात कोटय़वधी रुपये वाया घालवण्यापेक्षा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले चांगली डागडुजी करून जतन केले जावेत. तसेच या किल्ल्यावर मध्ययुगीन वास्तुकाम पुन्हा उभारावं, जेणेकरून पर्यटकांना पुन्हा शिवइतिहास अनुभवता येईल.

ज्येष्ठ इतिहास संशोधक असलेल्या कोल्हापूरच्या डॉ. जयसिंगराव पवार यांनाही तसंच वाटतं. मात्र किल्ल्यांवर मध्ययुगीन इतिहास उभा करतानाच शिवरायांच्या पराक्रमाला साजेसं असं त्यांचं स्मारकही उभं राहिलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

शिवरायांचा पराक्रम कालातीत आहे. तो त्यांनी उभारलेल्या, जतन केलेल्या गडकोटांच्या माध्यमातून अद्याप जिवंतही आहे. पण त्यांचं संपूर्ण जीवनदर्शन घडवणारं स्मारकही अत्यावश्यक आहे. मात्र या स्मारकाच्या निमित्ताने शिवाजी म्हणतो..सारखा खेळ मांडून जाती-जातीत फूट पाडणा-या पेंढा-यांना वेळीच आवरायला हवं.